करोनो नाही तर आता स्वाईन फ्लूचा एक रुग्ण । करोनो बाधित रुग्णाची प्रकृती उत्तम
नगर -जिल्हा रुग्णालयाकडून पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविण्यात आलेल्या 17 व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुन्यांपैकी 8 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, ते निगेटिव्ह असल्याचे म्हटले आहे. मात्र त्यातील एकाचा अहवाल स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आल्याने आता जिल्ह्यात करोनोपाठोपाठ स्वाईन फ्लूने डोकेवर काढले आहे. दरम्यान करोनाचा आढळलेल्या एका रुग्णाची प्रकृती उत्तम असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.
जिल्ह्यात आतापर्यंत 29 जणांचे नमुने पाठविण्यात आले असून, त्यापैकी आठ जणांचे अहवाल आलेला आहे. उर्वरित नमुने रात्री उशिरापर्यंत मिळणार असल्याचे द्विवेदी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयाने आज आणखी दोघा जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविले आहेत. दरम्यान, यापूर्वी बाधित सात देशांशिवाय दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिका येथून आलेल्या नागरिकांचीही तपासणी केली जाणार असून, त्यांना जिल्हा रुग्णालय येथे देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे, तर इतर देशातून आलेल्या नागरिकांना त्यांच्या घरीच देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.दरम्यान, जिल्ह्यातील नागरिकांनी करोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याने हा धोका आपण लवकर संपवू शकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
करोना विषाणू संसर्गासंदर्भात पुण्याहून अहवाल प्राप्त झाल्यानंतर द्विवेदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महापालिका आयुक्त एस.एन. मायकलवार, निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यावेळी उपस्थित होते. द्विवेदी म्हणाले, जे सध्या आठ जणांचे नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. ते निगेटिव्ह आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही.
मात्र, चीन, इटली, इराण, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, दक्षिण कोरियाबरोबरच आता दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिकेतून आलेल्या नागरिकांना वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, ज्या नागरिकांना घरीच वेगळे देररेखीखाली ठेवले जाणार आहे, त्यांनी घराबाहेर पडू नये, यासाठी त्यांच्यावर आरोग्य विभाग आणि पोलीस अंमलदारामार्फत लक्ष ठेवले जाणार आहे, जेणेकरुन त्यांनी स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी, तसेच इतर नागरिकांच्या संपर्कात येऊन प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसे न केल्यास संबंधित नागरिकांना जिल्हा रुग्णालयाच्या देखरेखीखाली ठेवले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषद, महापालिका अथवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महासभा स्थगित कराव्यात आणि एकाच वेळी गर्दी किंवा अनेक नागरिकांचा संपर्क येणार नाही, यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्याचेही द्विवेदी यांनी स्पष्ट केले.
यात्रा, जत्रा, मोठे उत्सव याठिकाणी होणारी गर्दी टाळण्याचे आवाहन यापूर्वीच करण्यात आले असून संबंधित उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांमार्फत तशा सूचना दिल्या आहेत. याशिवाय, मंगल कार्यालयांनाही गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले. महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्र तसेच लगतच्या क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये, आयटीआय, तंत्र प्रशाला, निवासी वसतीगृह बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, कोणतेही खासगी क्लासेसही या काळात सुरु राहणार नाहीत. तसे करणाऱ्यावर कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नगर- पुणे एसटीच्या 20 टक्के फेऱ्या बंद
करोनामुळे प्रवाशी संख्या घटली असून नगर-पुणे महामार्गावरील एसटी बसच्या 20 फेऱ्या कमी करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक विजय गीते यांनी दिली.
आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई
शाळा, महाविद्यालय 31 मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी स्पष्ट केले.