मुंबई – अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या सासू- सुनेची जोडी अनेकांच्या पसंतीस पडत असते. सोशल मीडियावर या दोघीही सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावरून दोघीही एकमेकींबद्दल प्रेम अनेकदा व्यक्त करत असतात. नुकतेच मृणाल कुलकर्णी यांनी सून शिवानीसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
आज शिवानीच्या वाढदिवसानिमित्त मृणाल कुलकर्णी यांनी एक पोस्ट लिहित त्यांच्या मनातली एक इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर शिवानीचा फोटो शेअर करत लिहिले की, “सूनबाई, कम सून !! प्रिय शिवानी, तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ! गेले 2-3 महिने अविरत कष्ट करते आहेस .. तेही हसतमुखाने… न दमता-न कंटाळता ! “तुला शिकविन चांगलाच धडा” मालिकेतली अक्षरा उर्फ मास्तरीन बाई म्हणून अमाप लोकप्रिय झाली आहेस. आम्हाला तुझ्या यशाचा खूप आनंद आहे. अभिमान आहे ! अशीच यशस्वी हो.. तुझी सारी स्वप्नं पूर्ण होऊ देत ! आनंदी रहा ! खूप खूप प्रेम ! (ता. क.- पण सून, come soon g ! Miss you! तुझे लाड कधी करायचे आम्ही?)”
शिवानी सध्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या शूटिंगमध्ये सध्या ती व्यस्त आहे. दरम्यान, अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांनी मागील वर्षी 3 मे रोजी विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर शिवानी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा!?’ या मालिकेत काम करत आहे.
यापूर्वी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ या सिनेमात शिवानी आणि मृणाल एकत्र दिसल्या होत्या. या चित्रपटात मृणाल कुलकर्णी जिजाऊंच्या भूमिकेत होत्या. थोरल्या भावाची पाठराखण करणाऱ्या सूर्याजी मालुसरेंच्या दमदार भूमिकेत अभिजीत श्वेतचंद्र दिसला, तर शिवानी त्यांच्या पत्नीच्या म्हणजेच यशोदाबाईंच्या भूमिकेत दिसली.