नागपूर – राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समाज माध्यमांवर ट्रोल करण्यामागे टोळी कार्यरत असल्याचा अंदाज व्यक्त करत आज भाजपा नेत्यांकडून पुन्हा एकदा फडणवीस यांना ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. याबाबत नागपुरातील भाजपा नेत्यांनी आज पोलीस आयुक्तांची भेट घेत त्यांच्याकडे ही तक्रार केली.
याबाबत माहिती देताना आमदार अनिल सोले यांनी, “पोलीस आयुक्तांकडे देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करण्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून महाराष्ट्रात आपण सर्वजणे एकत्रितपणे करोनाची लढाई लढत आहोत. मात्र देवेंद्र फडणवीस जेव्हा-केव्हा याबाबत काही भूमिका मांडतात तेव्हा त्यांना ट्रोल केलं जातं. यामागे एखादी टोळी कार्यरत असावी असा आमचा अंदाज आहे”.
तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांना समाज माध्यमांवर ट्रोल केल्या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. अशातच आता नागपूर आयुक्तांकडे देखील अशीच तक्रार दाखल करण्यात आली आहे.