कर्जत (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची कर्जत तालुक्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने कर्जत पंचायत समितीच्या सभापती अश्विनी कानगुडे जिल्हा परिषदेतील विविध अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तालुक्यातील विविध प्रश्नाबाबत निवेदन दिले.
सभापती कानगुडे यांनी जिल्हा ग्रामविकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक परिक्षित यादव यांची भेट घेतली. तालुक्यातील घरकुले, बचत गट आदी विषयांवर चर्चा केली. रोजगार हमी कक्षात उपमुख्यकार्यकारी अधिकारी सदाशिव लेले, विकास घिगे, जिल्हा समन्वयक अधिकारी यांची भेट घेऊन रोजगार हमी योजनेच्या विविध कामे करण्याबाबत चर्चा केली. या विभागातून त्यांनी 19 मंजूर विहिरीचे आदेश प्राप्त करून घेतले. तालुक्यात नरेगा योजना मोठ्या प्रमाणात राबवण्यासाठी पूर्ण सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले.