लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने बहुमतासह सत्ता राखली आहे. समाजवादी पक्षाने राज्यात भाजपसमोर मोठं आव्हान उभं केल्याचं चित्र दिसत होत. मात्र राज्यात समाजवादी पक्षाच्या जागा गेल्या निवडणुकांच्या तुलनेत दुपटीने वाढल्या असल्या तरी ते बहुमताच्या जादुई आकड्यापर्यंत पोहचू शकले नाहीत. अशातच आता निवडणुकांमधील पक्षाच्या पराभवामुळे आलेल्या नैराश्यातून एका कार्यकर्त्याने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ४० वर्षीय देवेंद्र यादव बबलू यांनी विधानसभा निवडणुकांमध्ये समाजवादी पक्षाच्या आपल्या गावातल्या उमेदवाराला जिंकून देण्याची जबाबदारी घेतली होती. मात्र त्यांना ती जबाबदारी पार पाडता आली नाही.
देवेंद्रच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, समाजवादी पक्ष निवडणुकीत हरल्याने त्याला गावातले लोक चिडवत होते, टोमणे मारत होते. त्यामुळे देवेंद्र अस्वस्थ होता. नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या देवेंद्र यादव बबलू यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्येच प्रयत्न केला. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवलं, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं.
माधोगंजचे इन्स्पेक्टर सुब्रत त्रिपाठी यांनी सांगितलं की देवेंद्र आपल्या घरातल्या दुसऱ्या मजल्यावरच्या खोलीत बसला होता. तिथेच त्याने देशी पिस्तुलाने स्वतःला गोळी झाडून घेतली. त्याच्या मागे त्याची पत्नी आणि तीन मुलं असा परिवार आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.