पश्‍चिमेला सोयाबीन तर पूर्वेला बाजरीची सर्वाधिक पेरणी

भात लागणीचा वेग वाढला; भुईमूग पेरणी वाढली

सातारा – जुलै महिन्याच्या अखेरीस जिल्ह्याच्या पश्‍चिमेला सोयाबीन तर पूर्वेला बाजरीची सर्वाधिक पेरणी झाली आहे. पश्‍चिमेला भात लागणीचा वेग वाढला असून भुईमूगाची देखील पेरणी वाढताना दिसून येत आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर मंदावला असून येत्या काही दिवसांत कोसळणाऱ्या पावसावर पिकाच्या उत्पादनाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

जिल्ह्यात गळीत धान्याची आतापर्यंत जवळपास 80 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक पेरणी सोयाबीनची 85 टक्केपर्यंत झाली आहे. तालुका व हेक्‍टरनिहाय मिळालेल्या माहितीनुसार, सातारा तालुक्‍यात सोयाबीनची 10 हजार 907 , जावळी तालुक्‍यात 2 हजार 905 , पाटण तालुक्‍यात 7 हजार 751, कराड तालुक्‍यात 11 हजार 407, कोरेगाव तालुक्‍यात 5 हजार 998 आणि वाई तालुक्‍यात 3 हजार 558, खटाव तालुक्‍यात 3 हजार 181 हेक्‍टरवर व त्याचबरोबर फलटण व खंडाळा तालुक्‍यात काही प्रमाणात सोयाबीनची पेरणी झाली आहे.

त्यापाठोपाठ जिल्ह्यात भुईमुगाची 75 टक्के पेरणी झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक पेरणी पाटण तालुक्‍यात झाली आहे. पाटण तालुक्‍यात अपेक्षित 15 हजार 985 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ कराड तालुक्‍यात 6 हजार 853, वाई तालुक्‍यात 1 हजार 29, जावळी तालुक्‍यात 3 हजार 183 तर सातारा तालुक्‍यात 2 हजार 340, खटाव तालुक्‍यात 551 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.

तृणधान्याची जिल्ह्यात 67 टक्के पेरणी झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक 80 टक्के बाजरीची पेरणी जिल्ह्याच्या पश्‍चिमेला झाली आहे. खटाव तालुक्‍यात 5 हजार 51, माणमध्ये 20 हजार 540, फलटणमध्ये 10 हजार 401 तर खंडाळा तालुक्‍यात 3 हजार 790 हेक्‍टरवर आणि कोरेगाव तालुक्‍यात देखील 80 हेक्‍टरवर बाजरीची पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ ज्वारीची 61 टक्के पेरणी झाली आहे. ज्वारीच्या पेरणीमध्ये पाटण तालुक्‍याने आघाडी घेतली आहे. पाटण तालुक्‍यात 8 हजार 618 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ कराड तालुक्‍यात 6 हजार 372 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे तर सातारा, वाई, जावली, कोरेगाव व खटाव तालुक्‍यात अल्प प्रमाणात ज्वारीची पेरणी झाली आहे.

दरम्यान, जिल्ह्याच्या पश्‍चिमेला भात लागणीचा वेग वाढला आहे. त्यामध्ये सर्वाधिक पाटण तालुक्‍यात 17 हजार 160 हेक्‍टर तर कराड तालुक्‍यात 4 हजार 199, जावली तालुक्‍यात 2 हजार 475, कराड तालुक्‍यात 4 हजार 199, वाई तालुक्‍यात 2 हजार 104, महाबळेश्‍वर तालुक्‍यात 2 हजार 950 आणि त्याचबरोबर खंडाळा, कोरेगाव आणि खटाव तालुक्‍यात देखील काही प्रमाणात भाताची लागण करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)