“काही गोष्टी अशा घडल्या की आता समोर कोणताच मार्ग दिसत नाही”; व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ स्टेटस ठेवून तरुणाची आत्महत्या

भिवंडी : व्हॉट्सअ‌ॅपवर व्हिडीओ स्टेटस ठेवून एका तरुणाने नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीमध्ये घडली असून मयूर रामा जाधव असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. कल्याण-पडघा मार्गावरील गांधारी पुलाजवळ सोमवारी ही धक्कादायक घटना घडली. नदीपात्रात शोध सुरु आहे.

मयूर हा कल्याण पश्चिम परिसरातील बारावे या गावात कुटुंबासह राहत होता. काल सकाळपासूनच तो दारुच्या नशेत होता, असे सांगण्यात येत आहे. धक्कादायक म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी मयूरने आपल्या मोबाईलवर एक व्हिडीओ बनवला होता. दारु ही माणसाच्या आयुष्यातील सर्वात वाईट गोष्ट असल्याचे तो या व्हिडीओमध्ये बोलत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने पुढे म्हटलं आहे की, “काही गोष्टी अशा घडल्या की आता समोर कोणताच मार्ग दिसत नाही. माझी आठवण जेव्हा काढाल तेव्हा हसून काढा. तुमच्या जीवनातील असा जोकर होता तो, आतून तुटलेला, मात्र तुम्हाला हसवत राहिला, असे म्हणत त्याने गांधारी पुलावरुन नदीपात्रात उडी घेतली.

व्हॉट्सअॅपमधील व्हिडीओ स्टेटसमुळे ही घटना समोर आली. यानंतर खडकपाडा आणि पडघा या दोन्ही पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशमन दलाच्या मदतीने मयूरचा शोध सुरु केला आहे. मात्र, मयूरने आत्महत्या का केली याचं कारण अद्यापही समजू शकलेले नाही. या प्रकरणी पडघा पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असून मृतदेह शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.