मुंबई – बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. जगभरात या चित्रपटाने मोठी कमाई केली. पठाणच्या यशानंतर शाहरुखच्या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. ‘डंकी’ आणि ‘जवान’ हे त्याचे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 7 सप्टेंबर 2023 रोजी ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा, अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता विजय सेतुपती देखील दिसणार आहे. शाहरुख खान याच्या चित्रपटांना चाहते हे मोठ्या प्रमाणात प्रेम देताना दिसत आहेत.
मात्र, अश्यातच या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जवान चित्रपटाचे काही व्हिडीओ आणि क्लिप व्हायरल होताना दिसत आहेत. यावर आता कायदेशीर पाऊल उचलण्यात आले आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंटने जवान चित्रपटाच्या काही क्लिप चोरी केल्या आणि ऑनलाइन लीक केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केले आहे.
या प्रकरणी मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात 10 ऑगस्ट रोजी एफआयआर दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. कॉपीराईटचे उल्लंघन केल्याचा आरोप रेड चिलीज एंटरटेनमेंटकडून करण्यात आला आहे. जवान चित्रपटाचे व्हिडीओ किंवा क्लिप व्हायरल होण्याची ही पहिली वेळ नाहीये. यापूर्वीही जवान चित्रपटाचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.