मुंबई – माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अर्थ एनजीओचे संस्थापक प्रवीण कलमे यांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवडी कोर्टात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल केली आहे.
प्रवीण कलमे यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, गेल्यावेळच्या सुनावणीमध्ये किरीट सोमय्या यांना जामीनवर सोडून देण्यात आले होते. मात्र न्यायालयाच्या बाहेर येताच किरीट सोमय्या यांनी प्रवीण कलमे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पुन्हा टीका सुरू केली.
तसेच आपल्या ट्विटर हॅंडलवरून त्यांच्याविरोधात पोस्ट करू लागले आहे. जी न्यायालयाच्या आदेशाची अवमानना असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
कायदे तज्ज्ञांच्या मते कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांचा जामीन रद्द करणे हे पुढचे पाऊल असू शकते.
याप्रकरणात आता पुढील सुनावणी 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. कोर्टाच्या पुढील सुनावणीमध्ये अब्रुनुकसानीचा दाव्यासोबतच कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी आणि जामीन रद्द करण्यासंदर्भात सुद्धा सुनावणी होण्याची शक्यता आहे.