सोलापूर – उस्मानाबाद आता भाजप आणि शिवसेनामय

सोलापूर  – सोलापूर जिल्हा ज्या तीन लोकसभा मतदारसंघात विभागला गेला आहे त्या सोलापूर, माढा व उस्मानाबादमध्ये महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहे. जो सोलापूर जिल्हा परंपरागत कॉंग्रेसचा मानला जात होता. तेथे आता लोकसभेच्या सर्व जागा भाजपा व शिवसेनेच्या हाती आहेत. सोलापूर व उस्मानाबाद या दोन्ही जागा मागील निवडणुकीत महायुतीकडेच होत्या तर यंदा यात माढ्याची भर पडली आहे.

राष्ट्रवादीचा गड असणाऱ्या माढ्यात ज्याचे नेतृत्व पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले आहे तेथे यंदा 2019 मध्ये राष्ट्रवादीच विजयी होईल, असा अंदाज बांधून जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे हे भाजपाचा हात सोडून राष्ट्रवादीत सामील झाले, परंतु त्यांचा अंदाज चुकला आणि भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना येथे यश मिळाले आहे. माढ्याला सातारा जिल्ह्याचा माण व फलटण हे विधानसभा मतदारसंघ जोडले आहेत. निंबाळकर हे फलटणचे आहेत. या निमित्ताने सातारा भागाला माढ्याचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून लिंगायत धर्मगुरू डॉ.जयसिध्देश्‍वर महास्वामी हे विजयी झाले आहेत. त्यांनी देशाचे माजी गृहमंत्री व कॉंग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला आहे. सलग दुसऱ्यांदा शिंदे हे येथून पराभूत झाले आहेत. त्यांनी यंदा आपली ही शेवटची निवडणूक असल्याची भावनिक साद घातली होती मात्र मतदारांनी भाजपाच्या पारड्यातच मतदान टाकले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा क्षेत्र जोडलेल्या उस्मानाबाद लोकसभेत शिवसेनेने यंदा उमेदवार बदलला होता व ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी येथून राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह यांचा पराभव केला आहे.

उमेदवार बदल पडला पथ्यावर

सोलापूर, माढा व उस्माबाद या तीन ही लोकसभा मतदारसंघात महायुतीने उमेदवार बदलले आहेत. 2014 ला माढ्यातून महायुतीकडून सदाभाऊ खोत तर सोलापूरमधून भाजपाच्या तिकिटावर ऍड. शरद बनसोडे व उस्मानाबादला शिवसेनेचे उमेदवार प्रा. रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी दिली होती. तर 2019 या तीन ही मतदारसंघात नवे चेहरे पुढे करण्यात आले होते. यात माढ्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर, सोलापूरमधून डॉ.जयसिध्देश्‍वर महास्वामी व उस्मानाबादमधून ओमराजे निंबाळकर यांचा समावेश होता. हा प्रयोग यशस्वी झाला असून तीन ही जागा महायुतीने जिंकल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.