– हलगर्जीपणाचा ठपका ठेवत पोलिसांवरही कारवाई
पुणे(प्रतिनिधी) – फ्लॅटची अनेकांना विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना शनिवारी सत्र न्यायाधीश आर. जी. देशपांडे यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
काळे यांनी 2002 मध्ये पिंपळे-निलख येथील औदुंबर सोसायटीत फ्लॅट घेतला होता. तो त्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून अनेकांना विकला, अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी सिंधू चव्हाण (रा. कोंढवा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काळे यांच्याविरोधात 4 मे 2019 ला सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानुसार उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे यांचे पथक 29 मे रोजी सोलापूर येथील विजापूर नाका पोलीस ठाण्यात गेले. काळे यांना ताब्यात घेऊन हे पथक त्याच दिवशी रात्री शहरात दाखल झाले. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
मात्र, त्यांना शिंका येऊ लागल्याने उपचार करण्यासाठी समजपत्र देऊन त्यांना सोडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. मात्र, पोलिसांनी काळे यांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. पण त्यांना सोडून देण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत सांगवी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, काळे यांनी ऍड. प्रशांत जाधव यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता.