पुणे – ‘रिसॉर्ट मॅनेजमेंट’ व्यवसायातून आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करत कराडमधील यशवंत सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी राज्याच्या सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजपचे नेते शेखर चरेगावकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुण्यातील ‘एमपीआयडी’ न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी हा आदेश दिला.
शेखर सुरेश चरेगांवकर यांच्यासह बुलडाणा येथील चिखली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश भगवानदास गुप्ता यांनी इतर साथीदारांसोबत संगनमत करून फसवणूक केल्याप्रकरणी प्रदीप रामचंद्र चोरघे यांनी न्यायालयात तक्रार अर्ज दिला होता. त्यावर महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) स्थापन विशेष न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार चरेगावकर यांच्यासह अन्य आरोपींविरोधात ५ मार्च रोजी भोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपींनी तक्रारदारांना गुंतवणूक योजनेअंतर्गत आठ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करत त्यापैकी साडेसहा कोटी रुपयांचा अपहार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी शेखर चरेगांवकर आणि रोहित लभडे यांनी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला. त्याला सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील मारुती वाडेकर आणि तक्रारदारांतर्फे अॅड. विपुल दुशिंग व अॅड. स्वानंद गोविंदवार यांनी विरोध केला. त्यांना अॅड. रोहित राहिंज व अॅड. अभिनव नलावडे यांनी साह्य केले.