विज्ञानविश्‍व: सॉकरपटू रोबोट्‌स

डॉ. मेघश्री दळवी
बॉस्टन डायनामिक्‍सचे रोबोट्‌स तऱ्हेतऱ्हेच्या कसरती करण्यात पटाईत आहेत. त्यात आता भर पडली आहे ती अमेरिकेतल्या एमआयटीच्या (मॅसाच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलजी) मिनी चित्त्यांची! चिमुकले, पण अतिशय चपळ असे हे रोबोट्‌स बऱ्याच करामती करत असतात. गेल्या आठवड्यात त्यांनी चक्‍क सॉकर खेळून दाखवलं आहे. अगदी खेळता खेळता धडपडण्यासहित! मिनी चित्ता रोबोट्‌सची उंची आहे सुमारे चाळीस सेंटीमीटर, लांबीही जवळजवळ तेवढीच आणि वजन आहे नऊ किलो. त्यात हालचालींच्या नियंत्रणासाठी बारा इलेक्‍ट्रिक मोटर्स आहेत. सेकंदाला अडीच मीटर इतका वेग ते गाठू शकतात.

हे मिनी चित्ता रोबोट्‌स चालतात, धावतात, जिन्यांवरून चढ-उतार करतात, उलटसुलट उड्या मारतात, अगदी कोलांटी उडीही मारू शकतात आणि खडबडीत पृष्ठभागावरून सहज चालू शकतात. त्यांच्यावर बसवलेले कॅमेरे आणि इतर संवेदक (सेन्सर्स) वापरून ते आजूबाजूच्या परिसराचा माणसासारखा अदमास घेऊ शकतात. त्यावरून सेकंदाला तीस निर्णय घेण्याची क्षमता असलेली बुद्धिमान यंत्रणा त्यांच्यामध्ये आहे. मिळालेली सर्व माहिती ते प्रक्षेपित करू शकतात, त्यामुळे सर्वेक्षण आणि देखरेख यासाठी त्यांचा वापर होत आहे. तेलविहिरी किंवा इतर धोक्‍याच्या जागी माणसांऐवजी असे रोबोट्‌स उपयुक्‍त ठरतात.

एमआयटीच्या बायोमिमेटिक्‍स लॅबमध्ये प्राण्यांची मिमिक्री किंवा नक्‍कल करून तसंच कसब रोबोट्‌समध्ये आणण्याचं संशोधन होतं. विशेषत: प्राण्यांमधली अंगभूत लवचिकता आणि कठीण परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता यांचा अभ्यास तिथे होतो. मधमाशीचे हलके तरीही मजबूत पंख, प्राण्यांच्या शेपट्या आणि त्यांचा सुकाणूसारखा वापर, चित्त्यासारख्या चपळ प्राण्यांच्या पायाची वैशिष्ट्यपूर्ण रचना, धावताना तोल सांभाळताना होणारी पायांची विशिष्ट हालचाल, यांचं विश्‍लेषण करून तशी क्षमता रोबोट्‌सना देण्याचे प्रयत्न या लॅबमध्ये सुरू असतात. या लॅबचे मिनी चित्ता अलीकडे खूपच गाजत आहेत ते सॉकरच्या व्हिडिओमुळे. एमआयटीच्या लॉनवर सॉकर खेळणारे मिनी चित्ते लगेचच सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागले.

नऊ जणांची टीम, त्यांना किक मारायला जमेल अशा आकाराचा चेंडू आणि हा चेंडू इकडून तिकडे फिरवताना त्यांची होणारी धावपळ अनेकांना गमतीशीर वाटत आहे. तर यंत्र इतक्‍या कौशल्याने खेळू शकतात म्हणून काही जण स्तिमित होत आहेत. काही अभ्यासू मंडळी यूट्यूबच्या या व्हिडीओची पारायणं करून रोबोट्‌सच्या हालचाली काटेकोरपणे पाहात आहेत. तर काही जण रोबोट्‌सच्या या अचाट कामगिरीने केवळ थक्‍क होऊन गेले आहेत. काहीही असो, आपणही या रोबोट्‌स खेळताना पाहून, एकमेकांना ढुशी देऊन पाडताना पाहून आणि लगेचच उठून परत खेळायची त्यांची तयारी पाहून गुंग होऊन जातो खरे! एमआयटीची बायोमिमेटिक्‍स लॅब आता सुपर मिनी चित्ता, ज्युनिअर चित्ता हेही बाजारात आणण्याचा विचार करते आहे. मुलांना छोटे छोटे प्रकल्प बनवण्यासाठी हे रोबोट्‌स वापरता येतील.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)