गुलाबी चेंडूचा अनुभवच निराळा

कोलकाता: कर्णधार विराट कोहली आणि कंपनीला यष्टीरक्षक वृद्धिमान साहा व प्रियांक पांचाळ या प्रथम दर्जाच्या क्रिकेटपटूंनी गुलाबी चेंडूबाबत काही अनुभव कथन केले आहेत. या चेंडूवर खेळण्याचा अनुभव निराळाच असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुलाबी चेंडूंचा वापर केला होता, त्यात पांचाळ नुसताच सहभागी झाला नाही तर तो सर्वात यशस्वी देखील झाला. याच अनुभवाची शिदोरी त्याने भारतीय संघासाठी खुली केली आहे. गुलाबी चेंडूने खेळण्याचा अनुभव गुजरातच्या प्रियांक पांचाळने घेतलेला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना यत्या शुक्रवारपासून येथील ईडन गार्डन मैदानावर आयोजित करण्यात आला असून या देशात प्रथमच दिवसरात्र पद्धतीने गुलाबी चेंडूवर हा सामना खेळविला जाणार आहे. भारताच्या पहिल्यावहिल्या प्रकाशझोतातील कसोटी सामन्यात भारतीय संघाला यश मिळावे यासाठी या चेंडूंवर खेळलेल्या पांचाळसह अनेकांनी कोहलीच्या संघाला मार्गदर्शन केले आहे.

गुलाबी चेंडूने खेळताना फलंदाजाने चेंडू बॅटवर येण्याची प्रतीक्षा करणे महत्त्वाचे आहे. गुलाबी, पांढरा चेंडू किंवा कसोटीसाठी वापरला जाणारा नियमित लाल चेंडू यांची एकमेकांशी तुलना करता येणार नाही. सूर्य मावळू लागला की, पहिली 15-20 मिनिटे फार महत्त्वाची असतील. आम्ही ज्या चेंडूने दुलिप स्पर्धेत खेळलो तिथे चेंडूची शिवण काळ्या रंगाची होती. जेव्हा फिरकी गोलंदाज मैदानात उतरत तेव्हा ती शिवण नजरेत येत नसे. त्यामुळे त्या संधीप्रकाशाच्या काळात फलंदाजाला अधिक सावध राहावे लागते. जर त्याल फलंदाज यशस्वी ठरला तर त्याची पुढील वाटचाल सुलभ होते.

साहा म्हणतो की, प्रारंभी चेंडू थोडा स्विंग होतो; पण नंतर रिव्हर्स स्विंगचाही अनुभव येतो. फिरकी गोलंदाजांनी चेंडूवर पकड मिळविणे कठीण होते. चेंडूही दवामुळे जड होतो. दुलिप ट्रॉफीत तीन वर्षे गुलाबी चेंडूने क्रिकेट खेळले गेले नंतर त्याला फाटा देण्यात आला. पण, “बीसीसीआय’ने पुन्हा एकदा दुलिप ट्रॉफी प्रकाशझोतात खेळवायचे ठरविले तर प्रियांक त्याचे स्वागत करतो. तो म्हणतो की, नेहमीच्या सामन्यांपेक्षा या सामन्यात वेगळी गंमत असते.

प्रियांकने 2017च्या दुलिप ट्रॉफीमध्ये गुलाबी चेंडूने खेळताना दोन शतके ठोकली होती. दुलिप ट्रॉफीमध्ये कुकाबुरा कंपनीच्या चेंडूंचा वापर करण्यात आला होता तर “ईडन गार्डन’वर होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत “एसजी’चे चेंडू वापरले जाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.