…तर मग तुम्ही हप्ता घेणारे आहात का? ;बाळा नांदगावकर यांचा अनिल परब यांना सवाल

सोलापूर : काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री अनिल परब यांनी मनसेला सुपारी घेऊन काम करणारा पक्ष आहे. अशी टीका केली होती. यावर प्रतिउत्तर देताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी परब यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्ही सुपारी घेणारे आहोत म्हणता, तुम्ही हप्ता घेणारे आहात का?, असा प्रश्न विचारत बाळा नांदगावकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.

“आम्ही सुपारी घेणारे आहोत म्हणता, तुम्ही हप्ता घेणारे आहात का? अनिल परब आणि माझा प्रवास सारखाच झालेला आहे. त्यामुळे कोण काय करतं हे मला चागलं माहित आहे. जाऊन केबलवाल्यांना विचारुन घ्या, मग कळेल.” असे म्हणत बाळा नांदगावकर यांनी परिवहन मंत्री अनिल परबांवर टिकास्त्र उगारले आहे. तसेच मुंबई महानगरपालिका निवडणूकीत भाजपसोबत युती करायची की नाही? याचा अधिकार पक्षप्रमुख राज ठाकरे घेतील. पक्षप्रमुखांनी एखादा निर्णय घेतला तर आम्ही त्याचे स्वागतच करतो. सध्या एकला चलो रे अशीच आमची भूमिका असल्याचे मत बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले आहे. ते सोलापुरात बोलत होते.

लॉकडाऊन दरम्यान आलेल्या वाढीव वीज बिलांच्या विरोधात मनसेतर्फे सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने महिलाही उपस्थित होत्या. बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर आक्रमक होत मनसेने आंदोलनाची हाक दिली आहे. या मुद्द्यावरुन परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी मनसेवर हल्लाबोल केला होता. तसेच यावेळी बोलताना अनिल परब यांनी भाजपवर वीज बिल होळी आंदोलनवरुनही टीका केली होती.

‘महाविकास आघाडीचं सरकार जाईल हे पाहत भाजपला 5 वर्ष काढायची आहेत. त्यानंतरही त्यांचे स्वप्न भंग होणार आहे. सत्तेविना ते अस्वस्थ झाले आहेत. कार्यकर्ते बिथरु नयेत म्हणून त्यांना असं बोलावं लागतं’, असे म्हणत अनिल परब यांनी भाजपचाही समाचार घेतला होता. वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने वीज बिल होळी आंदोलन करत राज्य सरकारला वेठीस धरले होते. अशातच वाढीव वीज बिल मुद्द्यांवरुन मनसेही आक्रमक झाली असून आज म्हणजेच, 26 सप्टेंबर रोजी मनसेने आंदोलनाची हाक दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.