मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचे आरोप केले. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर खुलासा करत आपल्याला ब्लॅकमेल करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. यावर, आता विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांची पूर्ण चौकशी व्हायला हवी. धनंजय मुंडे यांनी स्वत: कबुली दिली आहे. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असं फडणवीस यांनी म्हटले आहे
बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर खुलासा केला. त्यांनी दिलेल्या खुलाशावर नैतिकतेच्या आधारे पक्षाने विचार करण्याची गरज आहे. तरुणीच्या आरोपांपूर्वीच धनंजय मुंडे न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे संशयाचं वातावरण तयार झाले आहे. पोलिसांनी तत्काळ यामागचे सत्य बाहेर आणावे. पोलिसांनी सत्य बाहेर आणल्यानंतर आम्ही आमची मागणी करू, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार किरीट सोमय्या आणि महिला नेत्या चित्रा वाघ यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.