भोपाळ – मध्य प्रदेशच्या मोरेना जिल्ह्यातील विषारी दारूच्या बळींची संख्या 20 वर पोहोचली आहे. दरम्यान, येथील जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधिक्षकांना त्यांच्या स्थानावरून हटवण्याचे आदेश मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी दिले.
जिल्हा अबकारी अधिकारी जावेद अहमद, उपविभागीय पोलिस अधिकारी अविनाश राठोड यांसह दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. तर जिल्हाधिकारी अनुराग वर्मा आणि पोलिस अधिक्षक अनुराग सजिटिया यांच्याकडील अधिकार काढून घेण्यात आले.
मंगळवारी रात्री विषारी दारू प्यायल्याने 16 जण मरण पावले होते. तर चार जणांचा बुधवारी सकाळी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर अद्याप 20 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आज मरण पावलेल्या चार जणांपैकी तिघांची ओळख पटली असून चौथ्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
या दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री चौहान यांनी भोपाळमध्ये उच्च स्तरीय बैठक घेतली. मानपुरा, छेरा, नीरारूर, बलै का पुरा आणि अन्य गावातील ग्रामस्थांचा बळी पडलेल्यांमध्ये समावेश आहे. या गावातील नागरिकांना या घटनेने धक्का बसला आहे. दर दोन घरातील एक जण मरण तरी पावला आहे किंवा त्याच्यावर उपचार तरी सुरू आहेत.
दरम्यान, पोलिसांनी बेकायदा दारू गाळणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना पकडण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. यात सात स्थानिकांचा समावेश आहे.