हडपसर – आगामी लोकसभा निवडणूक शिरूर लोकसभा मतदारसंघातून लढण्यास मी इच्छुक आहे. परंतु देशाचे पंतप्रधान म्हणून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पहायचे आहे. त्यासाठी या ठिकाणी जर जनमत चाचणीमध्ये अन्य कोणी पुढे असेल, तर मी शिरूर लोकसभा मतदारसंघ सोडण्यास तयार आहे, अशी भूमिका माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केली. महंमदवाडी येथे हडपसर विधानसभा मतदार संघातील विकास कामांबद्दल आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे तसेच मतदार संघातील आजी-माजी पदाधिकारी, महिला आघाडी व युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिरूर लोकसभा निवडणूक शिवसेना (शिंदे गट) लढवणार का? असा सवाल पत्रकारांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना केला. तेव्हा आढळराव पाटील म्हणाले की, मी या मतदारसंघात लोकसभेसाठी इच्छुक आहेच. परंतु, लोकसभेसाठी पहिले ‘मिशन ४८’ आहे. यात महायुतीचे वरिष्ठ जे निर्णय घेतील तो मान्य आहे.
जनमत चाचणीमध्ये महायुतीतील जो कोणी ‘इच्छुक’ विजयासाठी प्रबळ असेल त्याला उमेदवारी द्यावी. अशावेळी मी स्वतः जर जनमत चाचणीत अन्य कोणी इच्छुकाच्या मागे असेल तर मी शिरूर लोकसभा निवडणूक सोडण्यास तयार आहे. ही माझी भूमिका असली तरी केंद्राच्या आणि राज्याच्या नेतृत्वाकडून लवकरच येथील चित्र स्पष्ट करण्यात येईल, असेही आढळराव पाटील म्हणाले.
शिवसेना शिंदे गटात लोकांचा सहभाग, विश्वास वाढत आहे, असे सांगून अधिक बोलताना नाना भानगिरे म्हणाले की, मतदारसंघात सुमारे दिडशे कोटींचा निधी उपलब्ध करून पर्यायी रस्ता, जलतरण तलाव, संतसृष्टी, रुग्णालय, इंटरनॅशनल स्केटिंग ग्राउंड, उद्यान, बाल उद्यान अशी कामे मार्गी लावण्यात येत आहेत. फातिमानगर ते कवडीपाट लोणी काळभोर असा सलग उड्डाणपूल उभारण्यात यावा, यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आखणी करण्यास सुरुवात केली आहे. मतदारसंघात आढावा बैठका घेत पक्षाचे मजबुतीकरण करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आपली कंबर कसली आहे. जागा वाटपाच्या चर्चा सध्या सुरू असून त्या जागांवर आपली वर्णी लावण्यासाठी इच्छुकांमध्ये चढाओढ लागली असल्याचे दिसते. शिरूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सलग दोन वेळा याचे प्रतिनिधीत्व केले आहे. आता पुन्हा एकदा आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात विकास कामांवर भर दिल्याचे दिसून येते. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष लक्ष राहिलेले शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांनीही मतदारसंघात मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून कोट्यावधींचा निधी उपलब्ध करून विकास कामे करण्यावर भर दिला आहे. यामुळे शिरूर लोकसभा आणि हडपसर विधानसभा मतदार संघावरील दावा अनुक्रमे शिवाजीराव आढळराव पाटील व नाना भानगिरे हे सोडणार नाहीत, असेच सध्या दिसून येत आहे.