Shirur Lok Sabha Election 2024 : शिरूर लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मंगलदास बांदल ( Mangaldas Bandal) यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने याबाबत घोषणा केली आहे. वंचितने बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र पक्षाच्या या निर्णयाविरोधात गेल्याने बांदल यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून बांदल यांची उमेदवारी रद्द करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हंटले आहे की, ‘वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते. बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघांत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्यामध्ये लढत होत आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीनीने उमेदवारी रद्द केल्यामुळे या ठिकाणी नवीन उमेदवार देणार की शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना पाठिंबा देणार? याबाबत अद्याप भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. शिरुर लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार असून मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे.