पुणे – महामेट्रोने शहरात आतापर्यंत 15 हजार 534 वृक्षांचे रोपण केले आहे; तर प्रकल्पात अडथळा ठरणारे 1 हजार 834 वृक्ष तोडून न टाकता त्यांचे यशस्वी पुनर्रोपण केले. येरवडा परिसरात नुकतीच 200 नवी झाडे लावण्यात आली असून, येत्या एक-दोन दिवसांत आणखी 100 वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे.
पुण्यात मेट्रो मार्ग निर्मितीमध्ये अनेक वृक्ष अडथळा ठरत आहेत. ते तोडण्याचा पर्याय न वापरता त्यांचे पुनर्रोपण म्हणजे त्या जागेवरून ते काढून दुसऱ्या जागांवर लावण्यात आले. त्यासाठी मेट्रोने या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीची खास नियुक्ती केली आहे.
1 हजार 884 जुने वृक्ष वेगवेगळ्या ठिकाणी पुनर्रोपीत करण्यात आले. कासारवाडी, डेक्कन, रेंज हिल ,पी.डब्लू.डी. ऑफिस, येरवडा ओपन जेल, बंड गार्डन, पीएमसी बंड गार्डन, आरे डेरी बसस्टॅन्ड जवळ, कृषी महाविद्यालय, वनाज कचरा डेपो अशा ठिकाणी लावलेले हे वृक्ष रुज असून, त्याची चांगली वाढ होत आहे.
शहरात तळजाई, आकडा इको पार्क, सहयोग केंद्र, खराडी 74, आर्मी कॅम्पस, पिंपळे, डेक्कन कॉलेज कॅम्पस अशा अनेक ठिकाणी महामेट्रोच्या वतीने आतापर्यंत 15 हजार 534 झाडे लावण्यात आली. ही झाडे निवडताना जाणीवपूर्वक मोठे झालेले रोप निवडण्यात येते. त्यातही भारतीय वंशाची सातवीन, कदंबा, बकुळ, जारुळ, बेल, उंबर, चाफा, कडुनिंब अशी उपयोगी तसेच अनेक वर्षे टिकणारीच झाडे लावण्यात येतात, अशी माहिती मेट्रो प्रशासनाने दिली.