मुंबई – यंदा 19 सप्टेंबर 2023 रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 14 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान 3100 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी आज अखेर 1700 बसेसचे गट आरक्षण पूर्ण झाले आहे.
गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना 50 टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. 14 सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. गणपती बाप्पा, कोकणचा चाकरमानी आणि एसटी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा सुमारे 3100 जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील. सदर बसेस आरक्षणासाठी https://msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.