पुणे – फळांचा राजा असलेल्या आंब्याचे सर्वांनाच आकर्षण असते. आता कोकणातील हापूस आंब्याच्या हंगामाला मार्केट यार्डात तुरळक आवकेने सुरूवात झाली आहे. डिसेंबरमध्ये बिगर हंगामी आवक होत होती. मात्र, आता मुख्य हंगामाच्या आंब्यांची आवक सुरू झाली आहे.
आडते असोसिएशनचे सचिव करण जाधव यांच्या पेढीवर पावस (जि. रत्नागिरी) येथील शेतकरी समीर हरचिरकार यांच्या बागेतील पाच डझनाच्या पेटीची आवक झाली. यावेळी हंगामातील पहिल्या पेटीची विधीवत पूजा करून हंगामाचा प्रारंभ झाला असून, पहिली पेटी युवराज काची यांनी २३ हजार रुपयांना खरेदी केल्याचे जाधव यांनी सांगितले.
यंदाच्या हापूस हंगामाबाबत बोलताना जाधव म्हणाले, यावर्षी अवकाळी पाऊस, थंडीची कमतरता यामुळे मोहोर कमी लागल्याने सुरूवातीच्या टप्प्यात हापूसची आवक कमी राहणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मोहोराचा हंगाम जोमात राहण्याचा अंदाज आहे. हंगामातील आवक टप्प्याटप्प्याने वाढेल. साधारण १० फेब्रुवारीपासून दररोज ५० पेट्यांची आवक सुरू होऊन, मार्चमध्ये मोठी आवक होईल. यानंतर दुसऱ्या बहाराच्या आंब्याची मुबलक आवक एप्रिल-मेदरम्यान होईल.
याबाबत बोलताना शेतकरी समिर हरचिरकार म्हणाले, आमची ६० झाडे असून, पहिल्या टप्प्यातील पहिली पेटी आज पुण्यात पाठविली. सध्यातरी हवामान चांगले असून, थंडी पडायला सुरू झाल्याने दुसऱ्या बहारातील आंब्याचे चांगले उत्पादन मिळेल असा अंदाज आहे.