पुणे – पुणे, शिरुर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास गुरुवारपासून (दि.18) पासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत पुणे- 16, शिरुरमधून 9 आणि मावळमधून 10 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत येत्या गुरुवारपर्यंत (दि.25) आहे.
जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरुर आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघासाठी दोन टप्प्यांत निवडणुका पार पाडणार आहे. पहिल्या टप्प्यात बारामती लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बारामतीसाठी एकूण 38 उमेदवार रिंगणात आहे.
तर तर दुसऱ्या टप्प्यात पुणे,शिरुर आणि मावळ या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. या तीन मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुणे व शिरुर लोकसभा मतदारसंघाचे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय येथे आहे. तर मावळ लोकसभा मतदारसंघाचे कार्यालय निगडी येथील पीएमआरडीएच्या कार्यालय येथे आहे.
पुणे, शिरुर आणि मावळ मतदारसंघासाठी उमेदवारी अर्जांची छाननी दि.26 एप्रिल रोजी होणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत दि.29एप्रिल पर्यंत आहे. त्यानंतर सोमवारी पुणे, मावळ आणि शिरुर मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.