श्रीनगर – काश्मीरच्या पर्वतराजीत शुक्रवारी रात्री नव्याने बर्फवृष्टी झाली. तसेच काश्मीर खोऱ्यात काही भागात पाऊसही झाल्याचे वृत्त आहे. गुलमर्ग भागात चार इंच बर्फवृष्टी झाली. झोजीला पास, अमरनाथ गुफां परिसर, सोनमर्ग, गुरेझ सेक्टर इत्यादी ठिकाणीही बर्फवृष्टी झाल्याच्या बातम्या आल्या आहेत.
श्रीनगर शहरात मात्र बर्फवृष्टी ऐवजी जोरदार पाऊस झाला. पुढील चोवीस तासात श्रीनगर आणि जम्मू भागात हलका ते मध्यम पाऊस किंवा बर्फवृष्टी होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हिमवृष्टीचा श्रृतू या भागात सुरू झाल्याने यापुढील काळातही कमीअधिक प्रमाणात येथे बर्फवृष्टी सुरूच राहणार आहे. त्यामुळे काश्मीर खोरे व जम्मू विभागातील तापमानात पुढील काळात मोठी घट होण्याची शक्यता आहे.