सिल्हेट – महिला आशिया चषकात भारतीय महिला संघाने सोमवारी थायलंडचा 37 धावांत धुव्वा उडवित 9 गडी राखून एकतर्फी विजय मिळविला. यापूर्वीच उपांत्य फेरीत प्रवेश मिळविलेल्या भारताने सहा पैकी पाच सामने जिंकत अव्वल स्थान कायम राखले आहे.
साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारत स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली खेळला. तिने घेतलेला निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवीत थायलंड संघाला 15.1 षटकातच 37 धावासंख्येवरच रोखले.
Sneh Rana bags the Player of the Match Award for her impressive three-wicket haul against Thailand as #TeamIndia register a clinical 9-wicket victory. 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/1AVHjyOrSL…#AsiaCup2022 | #INDvTHAI pic.twitter.com/tBT0qD4g2f
— BCCI Women (@BCCIWomen) October 10, 2022
या सामन्यात भारताकडून शेफाली वर्मा आणि एस. मेघना यांनी फलंदाजीची सुरुवात केली. मागील सामन्याची स्टार शेफाली 8 धावा करून बाद झाली. तिला नटाया बुचाथमने झेलबाद केले. त्यानंतर मेघना आणि पूजा वस्त्राकर यांनी संघाला विजय मिळवून दिला. मेघनाने 18 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 20 धावा केल्या. त्याचबरोबर वस्त्राकरने 12 चेंडूत 2 चौकार खेचत नाबाद 12 धावा करत सहाव्या षटकांतच विजयावर शिक्कामोर्तब करून दिला.
स्मृती मानधनाचा विक्रम
महिला आशिया चषकात भारताची अनुभवी सलामीवीर स्मृती मानधनाने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. या सामन्यात संघाची नियमित कर्णधार हरमनप्रीत कौरने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे उपकर्णधार स्मृतीने संघाचे नेतृत्व केले. यावेळी नाणेफेकीसाठी मैदानावर उतरताच आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 100 सामने पूर्ण करणारी ती दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू बनली. भारतातर्फे अशी कामगिरी सर्वात पहिल्यांदा हरमनप्रीत कौरनेच केली होती. तिने आतापर्यंत 135 टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. दरम्यान, स्मृतीने आतापर्यंत खेळलेल्या 100 सामन्यांमध्ये 26.96 च्या सरासरीने 2373 धावा केल्या आहेत. यामध्ये 17 अर्धशतकांचा समावेश आहे.
तत्पूर्वी, थायलंडला रोखण्यात भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी बजावली. थायलंडची सलामीवीर नन्नपत कोंचरोएंकाई (12) वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या ओलांडता आली नाही.
थायलंडचे विकेट
1-13, 2.5 षटके
2-20, 6.5 षटके
3-20, 6.6 षटके
4-21, 7.4 षटके
5-24, 8.5 षटके
6-24, 9.4 षटके
7-27, 10.6 षटके
8-28, 11.5 षटके
9-37, 14.5 षटके
10-37, 15.1 षटके
भारताची फिरकीपटू स्नेह राणाने तिच्या फिरकीने थायलंडला त्रस्त केले. राणाने 4 षटके टाकताना 9 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. दीप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी 2-2, तर मेघना सिंगने एक विकेट घेत सुरेख साथ दिली.
संक्षिप्त धावफलक
थायलंड : 15.1 षटकांत सर्वबाद 37 (नन्नपत कोंचरोएंकाई 12, नत्थकन चांथम 6, नटाया बुचाथम 7. स्नेह राणा 3-9, दिप्ती शर्मा 2-10, राजेश्वरी गायकवाड 2-8)
भारत : 6 षटकांत 1 बाद 40 (शेफाली वर्मा 8, मेघना नाबाद 20, पूजा वस्त्राकर नाबाद 12)