बँकाक – थायलंडमध्ये समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्याची तयारी पूर्ण झाली असून आज त्या देशाच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहात विवाह समानता विषयक विधेयक प्रचंड बहुमताने संमत करण्यात आले.
४१५ पैकी ४०० सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केले. हा कायदा झाल्यानंतर असा कायदा तयार करणारा थायलंड हा दक्षिण पूर्व आशियातील पहिला तर तैवान आणि नेपाळनंतर आशियातील तिसरा देश ठरणार आहे.
थायलंडच्या संसदेने बुधवारी विवाह समानता विधेयकाला मंजुरी दिली आहे. थायलंडमधील बहुतेक प्रमुख राजकीय पक्षांनी या कायद्याला पाठिंबा दिला आहे. गेल्या एक दशकापासून हा कायदा मंजुर करण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
संसदेच्या खालच्या सभागृहाने मंजुरी दिली असली तरी या विधेयकाला कायद्याचा दर्जा प्राप्त होण्यासाठी अगोदर सिनेट आणि नंतर थायलंडच्या राजाच्या मंजुरी मिळवावी लागणार आहे.
या प्रक्रियेसाठी १२० दिवसांचा कालावधी लागणार आहे. या विधेयकाच्या माध्यमातून पुरूष आणि महिला व पती आणि पत्नी या शब्दांना व्यक्ती आणि विवाह भागिदार असे संबोधण्यासाठी तेथील नागरी कायद्यात दुरूस्ती केली जाणार आहे.