चऱ्होली बुद्रुकमध्ये भानुदास कुंभार यांची तिसरी पिढी घडवाहेत मडकी
आळंदी- येथून जवळच असलेली चऱ्होली बुद्रुक (ता. हवेली) येथील भानुदास कुंभार हे वयाच्या बाराव्या वर्षापासून मडकी घडविण्याचे काम करीत आहेत.
बुधवारी (दि. 15) साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांतीसाठी सुगडी तयार असून, या कामात कुंभार यांना त्यांचे आई, वडील बंधू आणि पत्नीची साथ मिळाली आहे. बोळकी, कुंड्या, सुगडी आदी साहित्याचा साठा मोठ्या प्रमाणात करून ठेवला असून, त्यांनी याची घरीच विक्री सुरू केली आहे. बाजारात त्यांची किरकोळ विक्री 25 ते 30 रुपयांना असल्याचे भानुदास कुमार यांनी सांगितले.
“फिरत्या-चाकावरती-देती-मातीला-आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार’, या उक्तीनुसार गेल्या तीन पिढ्यांपासून कुंभार कुटुंब आपला व्यवसाय पारंपारिक पद्धतीने सांभाळीत आहेत. यंदा सुगडी बनवण्यासाठी लागणारी माती व इतर साहित्याच्या किमती वाढल्या असून देखील गतवर्षीच्या भावानेच यंदाही सुगड्यांची विक्री होत असल्याचे युवराज कुंभार यांनी सांगितले.