किव्ह – युक्रेनची राजधानी किव्हवर ताबा मिळवण्यासाठी शहरात रशियन फौजा घुसल्या खऱ्या पण त्यांना कडव्या प्रतिकाराला सामोरे जावे लागत आहे. हा लढा आता रस्त्यावर लढला जात आहे. रशियन फौजांच्या क्षेपणास्त्रांनी अनेक इमारतींना शनिवारी लक्ष्य बनवले. स्फोट आणि गोळीबाराच्या आवाजाने किव्ह शहर दणाणले आहे.
रशियाने गुरुवारी युक्रेनवर हल्ला चढवला. समुद्र, हवाई आणि जमिनीवरूनही युक्रेनवर आक्रमण केले. संपूर्ण देशभर आपले हल्ले रशियाने सुरू ठेवले असल्याचे चित्र आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादमिर पुतीन यांच्यासह थेट परराष्ट्र मंत्र्यावर अमेरिकेने लादलेल्या निर्बंधात युरोपीय महासंघ सहभागी होईल, असे व्हाईट हाऊसने शनिावारी स्पष्ट केले.
स्थलांतर सुरूच
युक्रेनमधून सुमारे एक लाख 20 हजार नागरिकांनी गुरूवारपासून स्थलांतर केले आहे. युक्रेनमध्ये पेच प्रसंग निर्माण झाल्यापासून सुमारे 40 लाख जण स्थलांतरीत झाले असल्याचे संयुक्त राष्ट्रेचे उप उच्चायुक्त (निर्वासित) केली क्लेमेंट यांनी सांगितले. त्या म्हणाल्या जगायचं की मरायचं याचा निर्णय नागरिक घेत आहेत. आठ लाख 50 हजार नागरिकांनी देशांतर्गत स्थलांतर केले आहे तर एक लाख 20 हजार जणांनी देश सोडला आहे.
शस्त्रे द्या राईड नको
अमेरिकेने सुरक्षितपणे युक्रेनमधून बाहेर नेण्यासाठी देऊ केलेली मदत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी फेटाळली आहे. “मला शस्त्रसाठा हवा आहे राईड नको आहे, अशा शब्दात झेलेन्स्की यांनी अमेरिकेला ठणकावले. युक्रेनच्या नागरिकांना त्यांच्या राष्ट्राध्यक्षांचा अभिमान आहे, असे ट्विट इंग्लंडमधील युक्रेनच्या दुतावासाने केले आहे. दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी आपण शस्त्र खाली ठेवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
खेरसानमध्ये रशियन फौजा
रशियन फौजा दक्षिणेकडील खेरसान शहराकडून घुसण्याच्या तयारीत आहेत. तेथे असणारा पूल उडवून देण्यात आला. नदीच्या दुसऱ्या बाजूस असणाऱ्या रशियन फौजांकडे रणगाड्यांचा ताफा आहे. त्यातून शुक्रवारी रात्री पासून मोठ्या प्रमाणात तोफगोळ्यांचा वर्षाव करण्यात येत आहे. तेथे अनेक सैनिकांचे मृतदेह पडलेले दिसत आहेत. त्यांच्याकडील शस्त्रे आणि पुलाच्या ढिगाऱ्यातील वस्तूंचा वापर नागरिक शस्त्र म्हणून करत आहेत. हे घनघोर युध्द सुरू असतानाच दुपारी खेरसान पडले. त्यावर रशियन फौजांनी कब्जा मिळवला.
रशियाचा दावा आणि वास्तव
युक्रेनच्या नागरिकांवर कोणीही हल्ला करत नाही. नागरी वस्तीवर हल्ला केलेला नाही असा दावा रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जी लावरोव्ह यांनी शुक्रवारी केला. प्रत्यक्षातील चित्र मात्र भलतेच सांगत असल्याचे सीएनएनच्या वृत्तात नमूद केले आहे. रहिवासी इमारती आणि लहान मुलांच्या शांळांवर बॉम्बिंग करण्यात आले. अनेक नागरिकांचा त्यात मृत्यू झाला आहे. हे युध्द सुरू झाल्यापासून नागरी वस्तीतील रस्त्यांवर अनेकदा क्षेपणास्त्रे पडल्याचे दिसत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
ऍम्नेस्टीचा आक्षेप
रशियन फौजा नागरी वस्तीवर हल्ले करत असल्याच आक्षेप ऍम्नेस्टी इंटरनॅशनलने नोंदवला आहे. रुग्णालयांसारख्या संरक्षित क्षेत्रातही रशियाचे हल्ले सुरू आहेत. डोनस्टेक येथे रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात चार नागरीक मरण पावले तर दहा जण जखमी झाल्याच्या घटनेकडे या संस्थेने लक्ष वेधले आहे.