सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील युट्यूबर जोडपे गणेश शिंदे आणि योगिता शिंदे यांनी वेगवेगळे व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर हलाखीच्या परिस्थितीतून प्रसिद्धीचे वलय गाठले. युट्यूबवर त्यांच्या व्हिडीओला लाखात तर काहींना मिलियनमध्ये व्ह्यूज असतात.
त्यातून त्यांना भरपूर पैसेही मिळतात. त्या पैशातून त्यांनी घर बांधले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी एक कार खरेदी केली. त्यानंतर त्यांना काही जणांकडून एवढे पैसे कुठून आले? म्हणत धमक्या आल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर त्यांनी एक व्हिडीओ तयार करून त्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या व्हिडीओला युट्यूबवर जाहिराती लावलेल्या आहेत. त्यातून त्यांना पैसे मिळाले आणि त्या पैशातून गाडी घेतल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी गणेश यांनी त्यांची परिस्थिती हलाखीची असल्याने आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. यावेळी त्यांना अनेकांना मदत केली आणि त्या पैशातून त्यांनी गाडी घेतल्याचा अनेकांना संशय आला. त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मदत म्हणून मिळालेले पैसे घेतलेल्या कामासाठी संपले आणि आता युट्यूबवरून जाहीरातीद्वारे मिळणाऱ्या पैशांतून घर बांधले आणि गाडी खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले.
या संदर्भातील एक व्हिडीओही त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या असून त्यांना न घाबरण्याचा आणि दुसऱ्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देण्याचा सल्ला दिला आहे. तसेच अनेकांनी त्यांचे व्हिडीओ खुप पाहायला आवडतात असे म्हंटले आहे. गणेश त्यांची पत्नी योगिता आणि मुलगी शिवाणी असे तिघेही व्हिडीओ बनवतात. शिवाणी खुप छोटी असून तिचा अभिनय चाहत्यांना खुप आवडतो.