पाणीपुरवठ्यासाठी पुन्हा सहा दिवसांची “डेडलाईन’

महापौर जाधव यांची माहिती : महासभेतील तक्रारींचा विशेष बैठकीत पुनरूच्चार

पिंपरी  – पिंपरी-चिंचवड शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा शनिवारपर्यंत सुरळीत करण्याची “डेडलाईन’ संपल्यानंतर शहरातील पाणीपुरवठा अद्यापही विस्कळीत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आता पुन्हा पाच ते सहा दिवसांची “डेडलाईन’ देण्यात आली आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली. महापालिकेतील पदाधिकारी, गटनेते, सर्वपक्षीय नगरसेवक आणि अधिकाऱ्यांची आज (मंगळवारी) विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत विशेष बैठक झाली. या बैठकीत सहा दिवसांपूर्वी महासभेत मांडलेल्या तक्रारीच नगरसेवकांनी आज पुन्हा मांडल्या.

पवना धरण शंभर टक्के भरले असताना तसेच पाणीपुरवठा विभागात मोठ्या प्रमाणात कर्मचारी व अधिकारी असतानाही शहरवासियांना विस्कळीत पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. महापालिकेने 19 ऑगस्टपासून आठवड्यातून एक दिवस विभागनिहाय पाणीकपात सुरु केली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. नागरिकांना पावसाळ्यातच पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप असल्याची भावना अनेक नगरसेवकांनी यावेळी बोलून दाखविली.

विस्कळीत पाणीपुरवठ्याचे बुधवारी (दि. 21) झालेल्या महासभेत पडसाद उमटले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्यावर आयुक्‍तांनी शनिवारपर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करुन पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल असे सांगत नगरसेवकांना आश्‍वस्त केले होते. मात्र शनिवारनंतरही शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात प्रशासनाला यश आले नाही. याचे पडसादही आज झालेल्या बैठकीत उमटले.

सहा दिवसानंतरही पाण्याच्या तक्रारी कायम आहेत. पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. महापौर राहुल जाधव म्हणाले, शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यात काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. पुढील पाच ते सहा दिवसात पाणीपुरवठा सुरळीत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)