भाजप नगरसेवकाने फेकला माईक : एकमेकांना “बघून घेण्याची भाषा’
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत आज चांगलीच हमरीतुमरी झाली. पाण्याची समस्या नगरसेवक मांडत असतानाच महापौरांनी बैठक संपल्याचे जाहीर केल्यामुळे संतापलेल्या भाजपा नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी हातातील माईक व्यासपीठाच्या दिशेने भिरकाविला. त्यानंतर नखाते आणि पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांच्यात हमरीतुमरी झाली. एकमेकांना “बघून घेण्याची भाषा’ करण्यात आल्याने उपस्थित नगरसेवक अवाक् झाले.
पाणीपुरवठ्यासह स्थापत्य, विद्युत, नागरवस्ती विकास योजना, पिंपरीतील भीमसृष्टीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज (मंगळवारी) ऑटो क्लस्टर येथे महापौर राहुल जाधव यांच्या अध्यतेखाली विशेष बैठक आयोजित केली होती. बैठकीला उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे सचिन चिखले, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्तसंतोष पाटील, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि सर्वपक्षीय नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते.
शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची डेडलाईन शनिवारपर्यंत देण्यात आली होती. परंतु, डेडलाईन संपली तरीही शहरातील पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. अनेक भागात पाणीपुरवठ्याची समस्या कायम आहे. पाणी वेळेवर येत नाही. पाण्याचे नियोजन कोलमडले आहे, अशा तक्रारींचा पाढा सर्वपक्षीय नगरसेवकांनी बैठकीत मांडला. महिला नगरसेविकांनी आक्रमक भूमिका घेतली.
भाजपचे रहाटणीचे नगरसेवक चंद्रकांत नखाते प्रभागातील पाण्याची समस्या मांडत होते.
मध्येच महापौर राहुल जाधव यांनी सर्व नगरसेवक त्याच समस्या मांडत असल्याचे सांगत बैठक संपल्याचे जाहीर केले. त्यामुळे संतापलेले नखाते यांनी हातातील माईक व्यासपीठाच्या दिशेने भिरकाविला. त्यानंतर नखाते आणि पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांच्यात जुंपली. प्रकरण हमरीतुमरीवर आले. दोघांनीही एकमेकांना बघून घेण्याची भाषा केल्याने उपस्थित अवाक झाले. या हमरीतुमरीमुळे पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाऐवजी बैठक वेगळ्याच कारणाने गाजली.
कार्यकारी अभियंता तांबे यांनी वेगळी भाषा वापरली
याबाबत बोलताना नगरसेवक चंद्रकांत नखाते म्हणाले, “पाणीपुरवठ्याच्या बैठकीसाठी आम्हाला बोलवले होते. प्रभागातील पाणीपुरवठ्याबाबतची समस्या मांडू दिली नाही. त्यामुळे माईक फेकला. कार्यकारी अभियंता रामदास तांबे काम व्यवस्थित करत नाहीत. सहा महिन्यांपूर्वी तापकीरनगर येथील नायडू टाकीवरुन पाणी देतो असे तांबे यांनी सांगितले होते. परंतु, केवळ पाईपलाईन टाकली आहे. आयुक्तांसमोर हे सांगण्याचा प्रयत्न केला असता तांबे यांनी मीच काम थांबवत होतो, असे सांगण्याचा प्रयत्न केला. नागरिकांना पाणी द्यायचे असताना मी कशाला काम थांबवेन. तांबे यांनी वेगळी भाषा वापरली. त्यामुळे मीही वाकडे-तिकडे बोललो.
शिष्टमंडळाशी चर्चा करत होतो
माईक फेकलेला मला माहीत नाही. मी यावेळी भीमसृष्टीच्या कामाचा आढावा घेत होतो. शिष्टमंडळ भेटीला आल्याने त्यांच्यासोबत आपण चर्चा करत होतो. त्यामुळे माईक फोडल्याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे महापौर जाधव यांनी सांगितले.