शिरवळ – म्हावशी (ता. खंडाळा) येथे मार्च महिन्यात वराह पालन शेडवर टाकलेल्या दरोड्यातील सहा दरोडेखोरांना जेरबंद करून पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 11 लाख 20 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अधिक माहिती अशी, भिमाजी रामचंद्र राऊत (वय 66, रा. म्हावशी ता. खंडाळा) यांचा शेतीस जोडधंदा म्हणून सुमारे सात वर्षापासून ब्राह्मणाचा मळा नावाच्या शिवारात वराह पालन करीत होते. एक मार्च रोजी त्यांच्या 400 वराह असलेल्या शेडवर रात्री एक ते तीनच्या सुमारास अनोळखी सात इसमांनी दोन पिकअप व एक दुचाकी वरून येऊन राऊत झोपलेल्या खोलीत शिरून त्यांना हातांनी व लाथा बुक्क्यांने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर त्यांचे हात-पाय व तोंड बांधून रोख एक लाख रूपये व 54 वराह असा एकूण सात लाख 18 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने वाहनामध्ये भरून दरोडा घातला होता. तसेच राऊत यांचा मोबाईल फोडून दुचाकीचे टायर पंक्चर करून वायरी तोडून नुकसान केले होते. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक विजय कुंभार व सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड करत होते.
त्या मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन दरोड्याच्या तपासासाठी त्यांनी संशयित आरोपी प्रकाश अशोक जाधव (वय 24, रा. तानाजी चौक शिरवळ), विलास श्रीपती माने (रा. केळेवाडी, पौंड फाटा,चांदणी चौक, ता. हवेली जि. पुणे, सध्या रा. चिंबळे ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर), महादेव तानाजी जाधव (रा. दापोडी ता. दौंड), विजय संजय साळूंखे (वय 21 रा. मांडकी ता. पुरंदर), केशव कैलास जाधव (वय 21 रा. टाकळी ता .दौंड) नागेश्वर बाळासाहेब जाधव (वय 19 रा. मांडकी ता. पुरंदर), श्रीकांत आनंदराव दानवले (वय 28 रा. मांडकी ता. पुरंदर) यांना ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता त्यांनी गुन्ह्यची कबुली दिली. सदर दरोड्यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तपासादरम्यान त्यांच्याकडून दोन पिकअप जीप तसेच एक दुचाकी व चोरी गेलेल्या एकूण 56 वराहापैकी चार लाख 50 हजार रूपये किमतीचे 40 वराह असा एकूण 11 लाख 20 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त केला आहे.
सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरूड, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळ्याचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरिक्षक महेश कदम, पोलीस हवालदार नितीन नलावडे, पोलीस सचिन वीर, प्रशांत धुमाळ, गिरीष भोईटे, बालाजी वडगावे, शिवशंकर तोटेवाड, विठ्ठल पवार यांच्या पथकाने कारवाई करून दरोडेखोरांना जेरबंद केले.