ठाणे – प्रेयसीला मारहाण प्रकरणात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचे पुत्र अश्वजित गायकवाड यांच्यासह तीन जणांवर अद्याप अटकेची कारवाई झालेली नसून त्याचबरोबर या गुन्ह्यात भादवी कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न करणे ) चा समावेश नसल्यामुळे पोलिसांवर चौफेर टिका होऊ लागली आहे.
या टिकेनंतर ठाणे पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांनी याप्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून त्यामार्फत तपास सुरू केला आहे. याप्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने घेतली असून आयोगाने ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडून तातडीने अहवाल मागवला आहे.
घोडबंदर येथील वाघबीळ भागात २६ वर्षीय पिडीत तरुणीने राहते. अश्वजित गायकवाड यांच्यासोबत गेल्या साडेचार वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचा दावा पीडितेने केला आहे. ११ डिसेंबर रोजी पहाटे ४.३० वाजता अश्वजीत याने घोडबंदर येथील एका हाॅटेलजवळ भेटण्यास बोलावले.
तिथे झालेल्या वादानंतर त्याने मारहाण करत कारने धडक देऊन गंभीर जखमी केल्याचा आरोप पीडितेने केला होता. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कासारवडवली पोलिसांनी अश्वजीत यांच्यासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.