सिंगापूर – भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हीने येथे सुरु असलेल्या सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
उपांत्यपूर्व फेरीत झालेल्या लढतीत सिंधूने चीनच्या ‘हान यू ‘ हीच्यावर 17-21, 21-11, 21-19 असा विजय मिळवला. या सामन्यात सिंधूने पहिली गेम गमावली होती. त्यानंतर तीने थरारक लढत देत दुसरी गेम जिंकत बरोबरी केली. तिसरी गेमही रोमहर्षक ठरली.
अखेर सिंधूने आपला सर्व अनुभव पणाला लावत तिसरी गेम व सामनाही जिंकला. हा सामना तब्बल एक तासांपेक्षा जास्त काळ चालला. आता उपांत्यफेरीत सिंधूचा सामना जपानच्या साएना कवाकामी हीच्याशी होणार आहे.