रेडा -जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तहसील, नगरपरिषद, उपजिल्हा रुग्णालय, पोलीस स्टेशन यांच्या संयुक्तपणे (दि.12) एकाचदिवशी विविध विभागाचे कर्मचारी व शिक्षक हे शहरातील घरोघरी जाऊन नागरिकांची ऑक्सिजन, थर्मामीटर गण, पल्समीटरद्वारे, करोना लक्षणाचे सर्वेक्षण करणार आहेत. रुग्णांचे ट्रेसिंग करणार आहेत.
यासंदर्भात तहसीलदार सोनाली मेटकरी, नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. एकनाथ चंदनशिवे, इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांच्या उपस्थितीत नियोजनाची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली.
मुख्याधिकारी डॉ. ठेंगल यांनी कशाप्रकारे सर्वेक्षण करावयाचे याविषयीची माहिती दिली. सोनाली मेटकरी म्हणाल्या की, तुम्ही करीत असलेल्या कार्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत. सर्व प्रकारची काळजी घेऊन सर्वेक्षण करावे. डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. नारायण सारंगकर, मुकुंद शहा यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सुभाष ओव्हाळ यांनी केले. प्रवीण धाईंजे यांनी आभार मानले.