मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना आज कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने सदावर्ते यांना पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदावर्ते यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदावर्तेंना 11 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी पोलिसांनी केली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याआधी सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. अॅड. सदावर्ते यांच्यासोबतच इतर 109 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यानंतर राज्यभर तणावाचे वातावरण होते. या हल्ल्यासाठी सदावर्ते जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
सदावर्ते यांनी 7 एप्रिल रोजी चिथावणीखोर भाषण केलं होतं. त्यात त्यांनी शरद पवार यांना टार्गेट करत 12 तारखेला आम्ही बारामतीत येऊ, घरी राहून दाखवा, असं आव्हान सदावर्ते यांनी पवारांना दिलं होतं.