मुंबई – राज्यात एकीकडे मराठा आरक्षणावरून राजकारण चांगलेच तापले असताना दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह सिल्व्हर ओकवर जाऊन राष्ट्रवादीचे (Ncp) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे.यावेळी जयंत पाटील हे देखील सिल्व्हर ओकवर उपस्थित होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्हही पक्ष एकत्र आले होते. आता विरोधी आघाडीमध्ये देखील हेच दोन्ही प्रमुख पक्ष आहेत. अशात उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. उद्या इंडिया आघाडीची महत्वाची बैठक पार पडणार असल्यामुळे ठाकरे आणि पवारांच्या या भेटीला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. उद्या म्हणजेच 13 सप्टेंबर रोजी शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी इंडिया आघाडीची समन्यव समितीची बैठक पार पडणार आहे. याच बैठकीसंबंधी चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सिलव्हर ओकवर गेल्याच बोललं जात आहे.इंडिया तसेच इंडिया आघाडी संदर्भात महत्त्वाचे निर्णय समन्यव समिती घेणार आहे. काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीची महत्वाची बैठक मुंबईत पार पडली होती. त्यानंतर इंडिया आघाडीतील स्थानिक पक्षांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल याची उत्सुकता सर्वांना लागली होती. अशात आता या आघाडीची समन्वय समितीची बैठक उद्या पार पडणार आहे. यासोबतच संसदेचं विशेष अधिवेशन देखील लवकरच होणार आहे.या सर्व बाबी लक्षात घेता ठाकरे आणि पवारांमधील ही भेट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.