मुंबई – उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच “सिल्व्हर ओक’वर दाखल झाले आहेत.राष्ट्रवादीमधील काही आमदारांना घेऊन अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर फक्त राष्ट्रवादीमध्येच नाही तर पवार कुटुंबीयांमध्ये देखील दरी निर्माण झाली कि काय ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला होता. अशात मंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल झाल्याचे समजते.
अजित पवार यांच्या काकू प्रतिभा पवार यांची भेट घेण्यासाठी ते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या रुग्णालयामध्ये त्यांच्या हातावर लहानशी शस्त्रकिया पार पडली असून त्यांना रात्री 8.30 वाजता घरी सोडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर अजित पवारांनी त्यांची सिल्व्हर ओकवर भेट घेतली आहे. तसेच त्यांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
आजच्या राज्यातील सरकारमध्ये मंत्री पदाचे खातेवाटप झाले. राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना आज आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला. अजित पवारांकडे अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच कृषी,सहकार अशी महत्वाची खाती देखील राष्ट्रवादीला देण्यात आली आहेत.