मुस्लिम पतीबरोबर जाण्याची शीख मुलीला परवानगी

पाक न्यायालयाचा निकाल

लाहोर – आपल्या कुटुंबीयांच्या ईच्छेविरोधात मुस्लिम व्यक्‍तीबरोबर विवाह केलेल्या शीख मुलीला तिच्या ईच्छेनुसार आपल्या पतीबरोबर कोठेही जाण्याचा अधिकार आहे, असा निकाल पाकिस्तानमधील लाहोर उच्च न्यायालयाने दिला आहे. ही मुलगी अल्पवयीन नसल्याने तिला तिच्याबद्दलचा निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये लाहोर परिसरात जातीय तणाव निर्माण झाला आहे. 

जागीर कौर असे संबंधित प्रकरणातील शीख मुलीचे नाव असून ती नानकाना साहिब भागातील रहिवासी आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तिचा विवाह तिच्याच परिसरात राहणाऱ्या मोहम्मद हसन नावाच्या इसमाबरोबर झाला. पतीबरोबर किंवा तिच्या इच्छेने कोठेही जायलाही तिच्या कुटुंबीयांचा विरोध होता. तिचे अपहरण हसन याने केले आणि बळजबरीने तिच्याशी विवाह केल्याचा कुटुंबीयांचा दावा होता.

गेल्या वर्षी सप्टेंबरपासून जागीर कौर लाहोरमधील एका निवारागृहात रहात आहे. हसन याने जागीर कौरचे नाव आयेशा असे ठेवले आहे. ही मुलगी सज्ञान असल्याचा दावा राष्ट्रीय नागरिक नोंदणी डाटाच्या आधारे हसन याच्यावतीने न्यायालयात करण्यात आला. तर ती अल्पवयीन असल्याचा शाळा सोडल्याचा दाखला पुरावा म्हणून तिच्या कुटुंबीयांनी न्यायालयात सादर केला.

या शीख मुलीचे अपहरण आणि बळजबरीने विवाहाबद्दल भारताकडूनही पाकिस्तानकडे चिंता व्यक्‍त केली होती आणि त्वरित कारवाईची मागणीही पाकिस्तान सरकारकडे केली होती. आपण स्वखुशीने विवाह केला असून इस्लाममध्ये धर्मांतर केले असल्याचे या मुलीने गेल्या सुनावणीच्यावेळी सांगितले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.