‘पीपीई किट्‌स दर नियंत्रणात आणू’

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे ‘आयएमए’ला आश्‍वासन

पुणे – पीपीई किट्‌स आणि मास्क यांच्या किमतीवर नियंत्रण नसल्यामुळे त्यांच्या किमती अवास्तव आकारल्या जात आहेत. त्यामुळे मोठा भुर्दंड पडत असून, त्यावर नियंत्रण आणणे आवश्‍यक असल्याची तक्रार इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली. त्या तक्रारीची दखल घेत येत्या दोन ते तीन दिवसांत पीपीई किट्‌स, मास्कच्या दरावर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन टोपे यांनी दिले. तसेच खासगी रुग्णालयांना सरकारने निश्‍चित केलेल्या दराची मुदत 31 ऑगस्टपर्यंत असून, त्या दरातही पुन्हा फेरबदल करण्यात येणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्र्यांनी दिले.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) शिष्टमंडळाने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी राज्याचे आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, आयएमएच्या राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे चेअरमन डॉ. मंगेश पाटे तसेच आयएमएचे माजी सचिव डॉ. सुहास पिंगळे उपस्थित होते.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने खासगी रुग्णालयांना दर निश्‍चित करून दिले आहेत. त्याबाबत खासगी रुग्णालयांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली असल्याचे सांगत, हॉस्पिटल्सच्या शुल्कासंदर्भात सरकारने काढलेल्या अधिसूचनेमध्ये काही गंभीर त्रुटी आहेत. महात्मा फुले योजना किंवा अन्य करोनाच्या व्यवस्थापनासाठीचे दर हे अशक्‍य आणि अव्यवहार्य आहेत. सध्याचे दर पुरेसे नाहीत. आयसीयू, ऑक्‍सिजन, इंन्फेक्‍शन कंट्रोल, पीपीई, मास्क, उपकरणे, मॉनिटर्स, रोजच्या अतिआवश्‍यक तपासण्या यासह कर्मचाऱ्यांचे पगार, त्यांचे कपडे, दळणवळण, कर्मचाऱ्यांचा विमा, डिस्पोजेबल वस्तू, बायो मेडिकल वेस्ट डिस्पोझेबलच्या शुल्काचा खर्चाचा विचार करण्यात आला नाही, त्याचा विचार करावा.

पुढील काळासाठी या दरात आयएमएशी चर्चा करून नवे दर ठरवण्यात यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर 31 ऑगस्टपूर्वी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे टोपे यांनी सांगितले. 45 डॉक्‍टरांचा करोनामुळे मृत्यू झाला असून सर्व पॅथीच्या कौन्सिलने संबंधित डॉक्‍टरांच्या विम्याचे प्रिमियम भरावे याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्‍वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.