पुण्यात गणेश विसर्जनासाठी फिरते हौद

क्षेत्रीय कार्यालयात मूर्तिदानाची व्यवस्था

पुणे – गणेश विसर्जनासाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय प्रत्येकी एक अशी फिरत्या हौदांची व्यवस्था करण्यात येणार आहे. मूर्ती घरीच विसर्जन करण्याला प्राधान्य द्यावे, मात्र ज्यांना घरी मूर्ती विसर्जित करणे अगदीच शक्‍य नाही, अशांनीच या व्यवस्थेत मूर्ती विसर्जित करावी, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

मूर्ती लवकर विरघळण्यासाठी शाडू मातीच्या मूर्तीनाच प्राधान्य द्यावे. तसेच, घरीच मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी पुणे महापालिकेकडून अमोनियम बायकार्बोनेट मोफत पुरवण्यात येणार आहे. मूर्ती विक्रेते, प्रभागातील आरोग्य कोठ्या आणि क्षेत्रीय कार्यालयाचे ठिकाणी सोडीयम बायकार्बोनेट उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

या वर्षी प्लॅस्टर ऑफ पॅरिस अथवा धातूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. अनंत चतुर्दशीला विसर्जन करून परत देव्हाऱ्यात ठेवता येऊ शकते. तसेच, ज्या नागरिकांना मूर्तीचे दान करायचे असेल त्यांच्यासाठी पालिका आणि स्वयंसेवी संस्था यांचे मार्फत प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांमध्ये व्यवस्था करण्यात येणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या काळात प्रतिवर्षी पुणे शहरात जवळपास पाच लाख मूर्तीचे विसर्जन होते आणि जवळपास 20 ते 25 लाख गणेशभक्त या दिवशी रस्त्यावर येतात. तथापि या वर्षी करोनाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी अशा पद्धतीने एकत्र येणे हे मोठ्या संकटाला आमंत्रण देणे ठरेल. गेली पाच महिने पुणेकरांनी अतिशय जबाबदरीने या संकटात प्रशासनाला साथ दिली आहे. या गणेशोत्सवाच्या कालावधीतही आपण सर्व पुणेकर गर्दी टाळून या करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहनही मोहोळ यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.