नवी दिल्ली – देशाने ऐतिहासिक कामगिरी बजावत आज कोविड -19 लसींच्या 100 कोटी मात्रा देण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. आपल्या ट्विटर संदेशामध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे अभिनंदन केले आणि हा विस्मयकारक पराक्रम गाजविल्याबद्दल देशातील वैज्ञानिक समुदाय आणि आरोग्य व्यावसायिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.मनसुख मांडवीया यांनीही देशाने हे यश संपादन केल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
गेल्या 24 तासांमध्ये 17,561 रूग्ण कोविडमुक्त झाल्याने, बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 कोटी 34 लाख 95 हजार 808 इतकी झाली आहे. परिणामी, भारतात रूग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.15 टक्के आहे. हा दर सध्या मार्च 2020 नंतरच्या उच्चांकी स्तरावर आहे.
केंद्र आणि राज्यांकडून सातत्यपूर्ण आणि सहयोगी प्रयत्नांमुळे सलग 116 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी दैनंदिन नवीन रुग्णांची नोंद सध्या होत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 18,454 नवीन रूग्णांची नोंद झाली. सक्रीय रुग्णांची संख्या सध्या 2 लाखांच्या खाली आहे आणि ती 1 लाख 78 ङजार 831 आहे. सक्रीय रुग्ण दर सध्या देशातील एकूण रुग्णांच्या 0.52 टक्के आहे, मार्च 2020 नंतर हा दर सर्वात कमी आहे.
देशभरात गेल्या 24 तासांत एकूण 12 लाख 47 हजार 506 चाचण्या केल्या गेल्या. भारताने आतापर्यंत एकूण 59.57 कोटी चाचण्या पूर्ण केल्या आहेत. देशभरात चाचणी क्षमता वाढत असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.34 टक्क्यांवर असून गेल्या 118 दिवसांपासून 3 टक्क्यांपेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.48 टक्के इतका नोंदवला गेला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर गेल्या 52 दिवसांपासून 3 टक्क्यांच्या खाली आणि आता सलग 135 दिवस 5 टक्क्यांच्या खाली राहिला आहे.