पुणे – महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची (सर्व्हायकल कॅन्सर) वाढती संख्या लक्षात घेता, देशव्यापी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडूनही महापालिका शाळेतील मुलींच्या लसीकरणासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरवात केली आहे. एप्रिल 2024 च्या पहिल्या आठवड्यात ही लसीकरण मोहीम सुरू होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
गर्भाशय मुखाचा कर्करोग हा जगभरातील महिलांमध्ये सामान्यत: चौथ्या क्रमांकावर आढळून येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दरवर्षी या सर्व्हायकल कॅन्सरमुळे तीन लाख महिलांचा मृत्यू होतो. एचपीव्ही (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) या विषाणूमुळे सर्व्हायकल कॅन्सरची समस्या दिसून येते. त्याशिवाय आनुवंशिकता हेही याचे प्रमुख कारण आहे. हा कॅन्सर रोखण्यासाठी लस उपलब्ध आहे, मात्र, त्याबाबत अनेक समज-गैरसमज असल्याने नागरिक लसीकरण करून घेत नाही. मात्र, या लसीकरणामुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे प्रमाण 90 टक्के कमी होऊ शकते.
याच पार्श्वभूमीवर देशात सर्व्हायकल कॅन्सर रोखण्यासाठी 9 ते 14 वयोगटातील मुलींना लसीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासार पुणे महापालिकेतही हे लसीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी आरोग्य विभागाकडून लस खरेदीसाठी नुकतीच निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. लस खरेदी झाल्यानंतर पुणे महापालिकेच्या शाळेतील इयत्ता नववीमधील मुलींना हे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर इयत्ता आठवीच्या मुलींनाही लसीकरण करण्यात येणार असून, या लसीकरणामुळे एचपीव्ही संसर्गाचा धोका कमी होण्यास मदत होईल. असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
सर्व्हायकल कॅन्सरची लक्षणे
– अनियमित मासिक पाळी
– वजन कमी होणे
– गर्भाशयातून पांढऱ्या पदार्थाचा स्राव होणे
– भूक न लागणे किंवा जेवताना पोट भरल्यासारखे वाटणे
– खूप जास्त थकवा जाणवणे
– ओटीपोटात खूप वेदना होणे किंवा सूज येणे
– शारीरिक संबंधांनंतर रक्तस्राव होणे
– मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्राव होणे