राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांची माहिती : पालिकेतील राजकारणाची सूत्रे बदलणार?
गावांच्या विकासासाठी 9 हजार कोटींची मागणी
पुणे – महापालिका हद्दीलगतच्या 23 गावांचा समावेशाच्या प्रस्तावावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी स्वाक्षरी केली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी दिली. त्यामुळे गावे समाविष्टची अधिसूचना जानेवारी महिन्यात निघण्याची शक्यता आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 23 गावांच्या समावेशाची प्रक्रिया शासनाने सुरू केली आहे. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आग्रही भूमिका घेतली आहे. यासाठी महापालिकेने दिलेल्या अभिप्रायामध्ये गावांच्या विकासासाठी 9 हजार कोटींच्या निधीची मागणी केली असून त्याचबरोबर अतिरिक्त पाणी कोटा मंजूर करावा, असे म्हटले आहे. त्यानुसार आता नगरविकास खात्याकडून गावांच्या समावेशाची कार्यवाही सुरू झाली असून मंगळवारी यासंबधीच्या प्रस्तावावर नगरविकास खात्याचे मंत्री शिंदे यांनी स्वाक्षरी केली असल्याचे तुपे यांनी सांगितले.
पालिका निवडणुकांच्या 2017 च्या निकालांमध्ये खराडी-मुंढवा, वारजे-माळवाडी अशा हद्दीवरील गावांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले. महापालिका हद्दीकडून मध्यवस्तीकडे येतो तसा राष्ट्रवादीचा प्रभाव कमी झालेला दिसतो. त्यामुळे हद्दीलगतचा ग्रामीण भाग (पूर्व हवेलीतील 23 गावे) हद्दीत घेऊन महापालिकेची सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेसने यानिमित्ताने केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.
आगामी काळात राजकीय उलथापालथी कितीही झाल्या, तरी आपली सदस्यसंख्या वाढवायची असे उद्दिष्ट राष्ट्रवादी कॉंग्रेसने ठेवलेले आहे. त्यासाठी ही व्यूहरचना केल्याचे सांगितले जाते.