बारामती शहरातील ‘सिग्नल’ बंद

यंत्रणा दुरुस्तीकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

बारामती – बारामतीत निधीचा गैरवापर होत असल्याची चर्चा सातत्याने होत असते. विरोधकांनी याच मुद्यावर सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवला असला तरी शहरांच्या सुविधांचे विषय वारंवार यातून चर्चेला येत आहेत. काही वर्षांपूर्वी शहरात सौरउर्जेवरील सिग्नल यंत्रणेवर लाखोंचा खर्च केलेला असताना आजही संपूर्ण शहरातील वाहतूक विना सिग्नल यंत्रणेशिवाय सुरू आहे.

बारामती पालिका प्रशासना “होवू दे खर्च…’ अशी भुमिका ठेवून विकासकामे करीत असली तरी विकास कमी अन्‌ भकास जास्त अशी स्थिती बारमती शहराची होऊ लागली असून याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची गरज असल्याची प्रतिक्रीया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

बारामती शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी याकरीता अपारंपरिक ऊर्जा विकास कार्यक्रमांतर्गत सौरउर्जेवरील सिग्नल बसविण्याकरिता लाखोंची तरतूद करण्यात आली होती या सौरउर्जेवरील सिग्नल यंत्रणेस तत्कालिन मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी विरोध केला होता; त्यानंतर आलेले मुख्याधिकारी उदय टेकाळे यांनी मात्र हा प्रकल्प शहरात राबविला होता. त्यानुसार शहरात पेन्सील चौक, भिगवण चौक व इंदापूर चौकात वाहतूक सौरउर्जेवरील नियंत्रक दिवे बसविण्यात आले.

सध्या, ही सिग्नल यंत्रणाच काय तर साधे सिग्नलही बंद आहेत. गेल्या काही वर्षांपासून या दिव्यांच्या देखभालीचे काम झालेले नाही. यामुळे ही यंत्रणा बंद अवस्थेत आहे. बारामती शहरात बाजारपेठ तसेच छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, सिनेमा रोड, स्टेशन रोड, महावीर पथ परिसरातही वाहतूक कोंडी होत असल्याने येथील सिग्नल यंत्रणा सुरू होणे गरजेचे आहे. याशिवाय भिगवण चौक, इंदापूर चौकातील सिग्नल यंत्रणा बंद असून इंदापूर चौकातील सौरऊर्जा यंत्रणाही बंद आहे.

बारामती शहरातील सिग्नल यंत्रण बंद असल्याबाबत वाहतूक पोलीसांकडून अनेक वेळा नगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. नगरसेवकांनीही यंत्रणा दुरुस्तीच मागणी केलेली आहे. परंतु, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करीत असून सध्या शहराची वाहूतक विना सिग्नल यंत्रणेशिवायच धावते आहे.यानुसार मुख्याधिकारी रवी पवार यांच्याशी संपर्क साधला असता,

शहरातील सिग्नल यंत्रणेकरीता अंदाजपत्रकात दुरुस्ती, देखभालीसाठी तरतूद करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. काही ठिकाणीची यंत्रणा तातडीने दुरूस्त केली जाईल. वाहतूक यंत्रणा सुरळीत करण्याकरीता नवी सिग्नल यंत्रणेबाबतही प्रयत्न केले जातील.
– योगेश कुडुसकर, मुख्याधिकारी, बारामती

शहरातील सिंग्नल यंत्रणा शोभेची…
इंदापूर चौकातील सिग्नलसह पालिका परिसर, गार्डन आदी भागात सिग्नल यंत्रणा लावण्यात आली असून या दिव्यांची दुरूस्ती करण्यारीता ठेकेदाराला देखभाल, दुरुस्तीचे काम देण्यात आले होते. मात्र, अशा कामांचे बिल निघण्यास होणारा विलंब या कारणातून संबंधीत ठेकेदार पुन्हा बारामतीत दिसलाही नाही. तसेच, भिगवण चौक आणि पेन्सिल चौकातील सिग्नल यंत्रणाही बंद असल्याने सध्या, तरी शहरातील वाहतूक यंत्रणा शोभेची वस्तु ठरत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)