माळवाडीत आढळली अडीच फूट लांबीची घोरपड

वन्यजीवरक्षक संस्थेकडून जीवदान

इंदोरी – माळवाडी (तळेगाव दाभाडे) येथे अभिजीत मावळे यांच्या घरात आढळलेल्या अडीच फूट लांब व अंदाजे एक किलो वजन असलेल्या घोरपडीला वन्यजीवरक्षक सदस्यांनी जीवदान दिले आहे. माळवाडी गावचे रहिवाशी अभिजीत मावळे यांना त्यांच्या घरातील कपाटामागे घोरपड आढळल्यानंतर त्यांनी वन्यजीवरक्षक संस्थेचे सदस्य भास्कर माळी यांच्याशी संपर्क साधला.

वन्यजीवरक्षक संस्थेचे सदस्य भास्कर माळी, प्रशांत भालेराव व रोहित दाभाडे घटनास्थळी पोहचले. वीस मिनिटांच्या कालावधीनंतर संस्थेच्या सदस्यांना घोरपडीला पकडण्यात यश आले. काही वेळानंतर घोरपडीला वन्यजीवरक्षक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष निलेश गराडे व वनअधिकाऱ्यांसह तळेगाव शेजारील डोंगरावर असलेल्या चौराई देवी मंदिराच्या परिसरात सोडण्यात येणार असल्याचे प्रशांत भालेराव यांनी सांगितले.

घोरपड हा दक्षिण आशियात आढळणारा मॉनिटर सरड्याचा एक विशाल प्रकार आहे. पाल, सरडा, घोयरा यांसारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांशी घोरपडीचे नाते जवळचे आहे. घोरपडीला इंग्रजीत “मॉनिटर लिझार्ड’ असे म्हणतात. ही घोरपडीची जात भारतात जवळजवळ सर्वत्र आढळते. भारतापेक्षा दक्षिण अमेरिका व वेस्ट इंडिज या ठिकाणी हा प्राणी मोठ्या प्रमाणात आढळतो.

घोरपड दिवसा शिकार करते. पक्षी व त्यांची अंडी, उंदीर, सरडे, साप, मासे, कवचधारी प्राणी व लहानमोठे कीटक यांवर ती उपजीविका करते, असे वन्यजीवरक्षक संस्थेचे सदस्य
व प्राणीमित्र भास्कर माळी यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.