Team India Coach : ‘पाँटिंग-लँगर’च्या ‘त्या’ दाव्यांमध्ये किती तथ्य..? BCCIचे सचिव जय शहांनी केला मोठा खुलासा…

Team India Coach : बीसीसीआयने अद्याप टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी कोणत्याही माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूशी संपर्क साधलेला किंवा त्याला ऑफर दिलेली नाही, असे म्हणत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी रिकी पाँटिंग यांच्या वृत्ताचे खंडन केले आहे. नुकताच ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि माजी विश्वकरंडक चॅम्पियन कर्णधार रिकी पाँटिंग यांनी बीसीसीआयने त्यांना टीम इंडियाचे प्रशिक्षक बनण्याची ऑफर दिली आहे, असा दावा केला होता.
शहा यांनी पुढे म्हटले की, मी किंवा बीसीसीआयने कोणत्याही माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूला प्रशिक्षक बनण्याची ऑफर दिलेली नाही. व्हायरल होत असलेली बातमी चुकीची आहे. जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलतो तेव्हा टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकपद हे सर्वांत महत्त्वाचे असते. भारतीय संघाचे जगातील सर्वाधिक चाहते आहेत. या नोकरीसाठी भरपूर व्यावसायिकता आवश्यक आहे, कारण तुम्ही जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंसोबत काम करत असतात.
योग्य व्यक्तीची निवड करू
आम्ही टीम इंडियासाठी योग्य पद्धतीने आणि प्रतिभेनुसार प्रशिक्षक निवडू. भारतीय क्रिकेटचे सखोल ज्ञान असलेल्या व्यक्तीची निवड करण्यावर आमचे लक्ष आहे. त्याला देशांतर्गत क्रिकेटचीही माहिती असली पाहिजे जेणेकरून तो टीम इंडियाला पुढच्या स्तरावर नेऊ शकेल, असेही शहा यांनी म्हटले आहे.





