Haryana Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीतील सहाव्या टप्प्यासाठी आज 25 मे रोजी मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 58 जागांसाठी मतदार त्यांचा कौल देतील. सहाव्या टप्प्यात देशाची राजधानी दिल्लीतील सर्व 7 आणि हरियाणातील सर्व 10 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे.
या टप्प्यात हरियाणातील अंबाला, कुरुक्षेत्र, सिरसा, हिसार, कर्नाल, सोनीपत, रोहतक, भिवानी-महेंद्रगड, गुडगाव आणि फरीदाबाद या सर्व 10 लोकसभा जागांवर मतदान होत आहे. भाजपने माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना काँग्रेसचे दिव्यांशु बुधीराजा यांच्या विरोधात करनाल मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
तर भाजपने कुरुक्षेत्रातून नवीन जिंदाल यांना उमेदवारी दिली आहे, जिथे ते आम आदमी पार्टी (आप) चे सुशील गुप्ता आणि इंडियन नॅशनल लोक दलचे अभय सिंह चौटाला विरोधात असणार आहे.
मतदान केल्यानंतर हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि करनाल लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मनोहर लाल खट्टर म्हणाले, ‘मी माझे मत दिले आहे. मी जनतेला लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करतो आणि भाजपला मतदान करण्याचे आवाहन करतो. काँग्रेस उमेदवार हे माझ्यासाठी आव्हान नसल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मनोहर लाल खट्टर यांनी लोकसभा आणि करनाल विधानसभा पोटनिवडणुकीसाठी स्वतंत्रपणे मतदान केले आहे.