चंदीगड – आपल्या मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी कॉंग्रेसचे आमदार व माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या घरावर काळा झेंडा लावला आहे. त्याने स्वतःच ट्विटरवर ही माहिती दिली असून प्रत्येक पंजाबी नागरिकांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
आपली पत्नी नवज्योत कोैर यांच्यासमवेत त्यांनी एक व्हिडिओ संदेशही ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की केंद्र सरकारच्या तीन काळ्या कायद्यांमुळे शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे. त्याच्या विरोधात पंजाब सशक्तपणे लढा देत आहे.
शेतकऱ्यांनी 26 मे हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्याचे आवाहन केले आहे. चाळीस शेतकरी संघटनांची एकछत्री संघटना असलेल्या संयुक्त किसान मोर्चाने पंतप्रधानांना पत्र लिहून चर्चेची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. त्याला सरकारने अजून प्रतिसाद दिलेला नाही.