चंडीगढ – पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी स्वपक्षातील (कॉंग्रेस) सहकारी आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर मंगळवारी जोरदार शाब्दिक तोफ डागली. पंजाबमधील स्वपक्षाच्याच सरकारवर सिद्धू सातत्याने टीका करत आहेत. बहुधा ते आम आदमी पक्षाच्या (आप) वाटेवर दिसतात, असे अमरिंदर यांनी म्हटले. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा दुरावा निर्माण झाल्याचे सूचित होत आहे.
कॉंग्रेसचे आमदार असणारे सिद्धू आणि अमरिंदर यांच्यात 2019 मधील लोकसभा निवडणुकीनंतर मतभेद निर्माण झाले. त्या निवडणुकीत शहरी भागांत कॉंग्रेसला चांगली कामगिरी करता आली नाही. त्याचे खापर त्यावेळी पंजाबचे मंत्री असणाऱ्या सिद्धू यांच्यावर अमरिंदर यांनी फोडले. अमरिंदर यांनी सिद्धू यांच्या खात्यांमध्ये बदल केला. त्यामुळे नाराज झालेल्या सिद्धू यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन होत असल्याचे चित्र समोर आले. मात्र, मागील काही दिवसांपासून सिद्धू यांनी पुन्हा अमरिंदर आणि राज्य सरकारवर टीकेचे सत्र अवलंबले आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या अमरिंदर यांनी सिद्धूंवर जोरदार पलटवार केला. सिद्धू कॉंग्रेसमध्ये असतील; तर त्यांची टीका म्हणजे बेशिस्तपणा आहे. त्यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी. त्यांचे डिपॉझिट जप्त होईल, अशा शब्दांत अमरिंदर यांनी आव्हानही दिले.
अमरिंदर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. पंजाबचे उपमुख्यमंत्री किंवा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनण्याची आकांक्षा सिद्धू बाळगून असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना अमरिंदर म्हणाले, अवघ्या चार वर्षांपूर्वी पक्षात आलेल्या नेत्याला प्रदेशाध्यक्ष कसे बनवता येईल? पंजाबमधील बहुतांश मंत्री सिद्धू यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. त्यामुळे सिद्धू यांना उपमुख्यमंत्री कसे करता येईल?